लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी-रूंदी वाढत आहे. या महामार्गावर वाशी परिसरात औद्योगिक वसाहत उभारल्यास खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे चित्र पालटू शकते. याबरोबरच कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीही मुख्यमंत्र्यांनी भरीव निधीची तरतूद करीत या कामाला आणखी गती देण्याची आवश्यकता असल्याच्या अपेक्षा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी उस्मानाबादी शेळी व्यवसायासाठी ठोस निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उस्मानाबाद बसस्थानक विकसित करण्याची गरज आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. तेर, ढोकी, तडवळा, येडशी पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलासाठी निधी द्यावा, सिंचन प्रकल्पासाठी भरीव तरतूद करावी, स्त्री रुग्णालयाची क्षमता वाढवित यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, बंधारे दुरूस्तीसाठी निधी द्यावा, कौडगाव औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, पीक विमा वाटपासाठी चलन उपलब्ध करून द्यावे तसेच २०१५ मधील रबी हंगामातील पीक कापणी प्रयोगाची सखोल चौकशी करण्याची मागणी आ. पाटील यांनी केली आहे. आ. सुजीतसिंह ठाकूर यांनीही कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी शासनाने आणखी निधी उपलब्ध करून दिल्यास या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे म्हटले आहे. सोलापूर-जळगाव आणि सोलापूर-हैदराबाद हे राष्ट्रीय महामार्ग चौपदरी होत आहेत. महामार्गाची लांबी-रूंदी वाढल्याने खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाशी परिसरात औद्योगिक वसाहत उभारल्यास या परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असे म्हटले आहे. आ. ज्ञानराज चौगुले यांनी जिल्ह्यात मग्रारोहयोची कामे मोठ्या संख्येने वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. निधीअभावी रखडलेल्या सर्व पेयजल योजनांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करावा, याबरोबरच तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मोफत सुविधा पुरविण्याचीही चौगुले यांची मागणी आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या २१ टीएमसी पाण्यासाठी ठोस निधीची आवश्यकता आहे. सलग तीन वर्षांपासून दुष्काळ असताना भूम तालुक्याला अत्यंत कमी प्रमाणात पीक विमा मिळाला आहे. त्यामुळे याबाबत चौकशीची मागणी आ. राहुल मोटे यांनी केली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी रोहयोअंतर्गत विहिरीची कामे झाली. मात्र, जलवाहिनीसाठी निधी नाही. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. भूम, परंडा, वाशी तालुक्यात रोहयोची कामे बंद आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही कामे चालू झाली असून, ती दौऱ्यानंतर बंद करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.जिल्ह्यातील अनेक विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. विशेषत: पाटबंधारे विभागातील बंधारे, तलाव यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. तसेच जिल्ह्याला मिळणारे कृष्णा खोरेचे सात टीएमसी पाण्याचा प्म्न निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. तो प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी आ. मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. उस्मानाबाद, नळदुर्ग येथल रुग्णालयातही अनेक समस्या असून, त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटपाबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय महामार्गावर हवी औद्योगिक वसाहत..!
By admin | Published: May 12, 2017 11:46 PM