औरंगाबाद : महाराष्ट्र बंदमध्येवाळूज एमआयडीसीमध्ये आंदोलकांनी येथे ६० मोठ्या कंपन्या आणि १५ हून अधिक लहान कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड केली. या प्रकरणी उद्योजकांनी संताप व्यक्त केला असून आज येथील बहुतांश उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी एक बैठक घेऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या अकल्पनीय हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्योजक संघटनांनी गुरुवारी रात्री उशिरा एक पत्रकार परिषद घेतली होती. याबाबत पुढील भूमिका घेण्यासाठी सर्व उद्योजकांची एक बैठक मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे आज सकाळी ११ वाजता झाली. यात सर्व उद्योजकांनी आपले म्हणणे मांडून याप्रकरणी काही सूचना व मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर शहरातील सर्व उद्योजक संघटनांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले आहे. कंपन्यांवरील हा हल्ला अतिरेकी स्वरूपाचे असून हल्ल्खोरांची ओळख पटवून त्यांना उद्योगात नोकरी बंदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पोलिसांना देणार सीसीटीव्ही फुटेज गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी उद्योजकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजगी व्यक्त केली. हा हल्ला थांबविण्यास पोलीस असमर्थ ठरल्याचे मत उद्योजकांनी बैठकीत व्यक्त केले. तसेच कालच्या घटनेतील उद्योगातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांत तक्रारदेखील करण्यात येणार आहे अशी माहिती सीएमआयचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली.
हल्लेखोरांना नोकरी बंदी हल्लेखोरांचे सीसीटीव्हीतील फुटेज सर्व उद्योजकांना देण्यात येणार आहे. यात आढळून येणाऱ्या हल्लेखोरांना ओळखून ते कामावर असतील तर त्यांना कामावरून कमी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच हल्लेखोरांना यापुढे येथील उद्योगांमध्ये नोकरीसाठी बंदी घालण्यात आल्याचे या बैठकीत ठरले आहे.
आज उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय एण्ड्युरन्सचे सर्व प्लांट शुक्रवारी बंद राहणार आहेत. मायलॉन, कॅनपॅक, सिमेन्स, नहार इंजि. यासह अनेक उद्योग बंद राहतील.
या कंपन्यांना बसला फटका आंदोलकांच्या हल्ल्यात बजाज, व्हेरॉक, इण्डुरन्स, स्टरलाईट, कॅनपॅक, गुडईअर, मायलान, स्टरलाईट, आकार टुल्स, मेटलमॅन, व्हेरॉक, एण्डुरन्स, सीमेन्स, गणेश प्रेसिंग, आकांक्षा पॅकेजिंग, नहार इंजिनिअरिंग आदी बड्या कंपन्यांसह इतर छोट्या ६० हून अधिक कंपन्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आकार टुल्स कंपनीत उत्पादित विविध प्रकारचे पान्हे व साहित्य जमावाने रस्त्यावर फेकले होते. तर बजाज ऑटो कंपनीत जनरल शिफ्टमध्ये येणाऱ्या कामगारांना बंदमुळे कंपनीने फर्स्टशिपमध्ये कामासाठी बोलावले होते. याची माहिती मिळताच आंदोलकांनी कामगारांच्या बस अडवून कामगारांना त्यांनी खाली उतरू दिले नाही. या घटनेमुळे कंपनी व्यवस्थापनाने सेकंड व थर्ड शिफ्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
भाजप उद्योग आघाडीकडून कारवाईची मागणी वाळूज औद्योगिक क्षेत्रात तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची सीसीटीव्ही फूटेजव्दारे ओळख पटवून कठोरात कठोर शासन करण्याची मागणी भाजपा उद्योग आघाडीने मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. अशी माहिती भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली आहे.