औरंगाबाद : औरंगाबादेतील उद्योगांची गाडी हळूहळू रुळावर येत असली तरी पूर्णवेळ बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उद्योजकांनी उत्पादनासंबंधी सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, उत्पादित मालाला उठाव नसल्यामुळे ऑर्डरचे प्रमाणही ७० टक्क्यांवरच स्थिरावले आहे.
गेल्यावर्षी लॉकडाऊननंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उद्योगांनी गती घेतली होती. विस्कटलेले अर्थचक्र दिवाळीनंतर रुळावर येत होते. त्यानंतर औरंगाबादेत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले व मार्चनंतर पुन्हा दुसऱ्यांदा उद्योगांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी होती; पण बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे उद्योगांची उत्पादन क्षमता ४०-५० टक्क्यांपर्यंत घसरली. गेल्या महिन्यात ७ तारखेपासून अनलॉक जाहीर करण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या आदेशानुसार बाजारपेठांवर निर्बंध लावण्यात आले. मर्यादित वेळांसाठी बाजारपेठा सुरू असल्यामुळे उत्पादित मालाला फारसा उठाव नाही. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, औरंगाबादेतील ऑटोमोबाइल उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे उद्योगांनी सावध पवित्रा घेत मर्यादित स्वरूपातच उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवली आहे. सद्य:स्थितीत औरंगाबादेतील उद्योगांची उत्पादन क्षमता ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
सध्या उद्योगांना कुशल कामगारांची टंचाई भासत आहे. लॉकडाऊनमध्ये परत गेलेले परप्रांतीय कामगार आता हळूहळू परतत असले तरी त्यांची संख्या खूप कमी आहे. आगामी गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय झाला, तर उद्योग गती घेतील, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
चौकट..
ऑटोमोबाइल उद्योगांना सर्वाधिक फटका
यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमण अजगावकर यांनी सांगितले की, बाजारपेठांचे निर्बंध उठले, तर नागरिक खरेदीसाठी येतील व मालाला उठाव येईल. सध्या मालाला उठाव नसल्यामुळे उद्योगांची गती मंदावलेलीच आहे. पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. ऑर्डरचे प्रमाण ७० टक्क्यांवरच स्थिरावले आहे. कच्चामालदेखील वेळेवर उपलब्ध होत नाही. यासारख्या अनेक अडचणीतून उद्योग मार्ग काढत आहेत. बाजारपेठांवरील निर्बंधामुळे ऑटोमोबाइल उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे.