लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वाळूज येथील कंपन्यांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांचे एक शिष्टमंडळ १७ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. याच दिवशी उद्योगमंत्री वाळूजची पाहणी करणार आहेत. औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षेसंदर्भात विविध मागण्या उद्योजक त्यांच्याकडे करणार आहेत, अशी माहिती ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांनी दिली.वाळूज महानगरातील कंपन्यांच्या तोडफोडीच्या घटनेनंतरही मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी काहीही पाऊल उचलले नसल्याची टीका उद्योग वर्तुळातून झाली. या सगळ्यामुळे अखेर या घटनेची मंत्रालयात उच्च स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली.या घटनेसंदर्भात शहरातील उद्योजकांना चर्चेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून शुक्रवारची वेळ देण्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीत प्रवेशासाठी एकापेक्षा अधिक रस्ते असणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी वाढविणे, वाळूज एमआयडीसीसाठी आणखी एक पोलीस ठाणे करणे यासह सुरक्षेसंदर्भात विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या जाणारआहेत.यासंदर्भात ‘सीएमआयए’तर्फे १६ आॅगस्ट रोजी शहरात एक बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.विविध औद्योगिक संघटनांचे काही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा करतील. याच दिवशी उद्योगमंत्री सुभाष देसाई शहरात येणार आहेत. वाळूज येथे कंपन्यांची पाहणी करणार आहेत. उद्योजक उद्योगमंत्र्यांशी चर्चा करतील, असे राम भोगले यांनी सांगितले.
उद्योगमंत्री मात्र येणार औरंगाबाद शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:41 AM