औरंगाबाद: मद्य प्राशन करून वाहन चालविणार्याविरोधात कारवाई करीत असताना पकडलेल्या एका वाहनचालकाने त्याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी पोलिसांसमोर बराच गोंधळ घातला. यावेळी त्याने छावणी वाहतूक शाखा कार्यालयात फौजदाराच्या टेबलवरील काच फोडली आणि काचेच्या तुकड्याने स्वत:वर मारून घेतले. ही घटना २० डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.१५ वाजेच्या सुमारास घडली.
बाळकृष्ण सांडू शेजूळ(रा.आडगाव भूमे, ता. फुलंब्री)असे अटकेतील मद्यपी वाहनचालकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे म्हणाले की, बुधवारी रात्री वाहतूक पोलीस छावणी परिसरातील राजस्थान हॉटेलसमोर मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई करीत होते. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण शेजूळ याला दारूच्या नशेत वाहनचालविताना पकडले.
यावेळी आपल्याविरोधात कारवाई होत असल्याचे लक्षात येताच त्याने गोंधळ करण्यास सुरवात केली. यामुळे पोलिसांनी त्याला एका वाहनातून छावणी वाहतूक शाखेत नेले. तेथे पोलीस उपनिरीक्षक तूषार मुरलीधर देवरे कर्तव्यावर होते. यावेळी त्यांने देवरे यांच्या टेबलवरील काच फोडली. यावेळी काचेच्या एका तुकड्याने त्याने स्वत:च्या अंगावरील शर्ट फाडून स्वत:ला मारून घेतल्याने तो जखमी झाला. यावेळी उपनिरीक्षक देवरे मद्यपीला पकडण्यासाठी देवरे यांना मदत करण्यासाठी धावलेल्या टाकसाळे यांनाही काचेच्या तुकड्याने त्याने घाव केला. याप्रकरणी देवरे यांच्या तक्रारीवरून आरोपीला पोलिसांनी अटक केली.