लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादमध्ये आणखी ४७ व नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधितांचे निदान झाल्याने मराठवाडावासियांची चिंता कायम आहे. औरंगाबादला पुन्हा एक बळी गेल्याने मराठवाड्याची मृत्यूसंख्या १०४ झाली. एकूण २५८२ पैकी १५९८ रुग्ण बरे झाले आहेत.
औरंगाबाद बुधवारी ४७ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६९६ झाली. यापैकी १०८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.एकाच दिवसात २३ नवीन रुग्ण आढळल्याने नांदेडातही खळबळ उडाली. एकूण बाधितांची संख्या १७५ एवढी झाली आहे. बीड जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ६५ आहे. यातील ४४ कोरोनामुक्त झाले आहेत तर एकाचा मृत्यू झालेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ८८ बाधितांची नोंद झालेली आहे़ यातील तीन बाधितांचा मृत्यू झाला व ३२ जणांना सुटी देण्यात आली आहे़
हिंगोली जिल्ह्यात ४५ तर परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातील तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. परभणीत सध्या एकूण ८६ रुग्ण असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे़लातूर जिल्ह्यात १३६ पैकी ७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यापूर्वीच तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.जालना जिल्ह्यात आजवर एकूण १५३ कोरोना बाधितांपैकी ५८ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला आहे.