नागद : परिसरातील पाळीव प्राण्यांना लाळ, खुरकत आजाराची माेठ्या प्रमाणात लागण झाली आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. हा आजार जडल्यानंतर जनावरांच्या शरीरावर फोड येत असून तापमान वाढत आहे. तसेच फोड फुटून त्या जखमेत अळ्या पडत आहेत. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात योग्य उपचार मिळत नसल्याने खासगी डॉक्टरांकडे शेतकऱ्यांना धाव घ्यावी लागत आहे.
येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाच जागा असून येथे केवळ दोन कर्मचारी काम करतात. दीड वर्षापासून या दवाखान्यात औषधीच नसल्याची माहिती ड्रेसर के. बी. पारधी यांनी दिली. या दवाखान्यात डाॅक्टर नाही, औषधी नाही, लसीकरण केले जात नाही. कर्मचारी दवाखान्यात थांबत नाहीत, पशुधन पर्यवेक्षक येथे थांबत नसून माझ्याकडे चिंचोली लिंबाजीचाही अतिरिक्त चार्ज असल्याचे सांगतात. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रा.पं. सदस्य रणजित ठाकरे, महावीर जैन, भय्या पाटील, अनिल महाजन, सुनील पाटील आदींनी केली आहे.