उंडणगाव : सध्या वातावरणातील बदल तसेच व्हायरल इन्फेक्शनमुळे गावात घरोघरी एक ना एक जण आजारी आहे. इतकी बिकट परिस्थिती असताना प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मात्र कुठल्याही तपासण्या नाहीत. सर्वेक्षण नाही, पाणी नमुने तपासणी नाही. सर्व अधिकारी, कर्मचारी हे झोपेच्या सोंगेत असून, त्यांना कारवाईचे इंजेक्शन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच अधूनमधून पाऊस कोसळत आहे. अशा विचित्र व थंडगार वातावरणातील बदलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील घराघरात थंडीताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, चिकुन गुन्या, खोकला, जुलाब, उलटी, मळमळ आदी साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली असून, अनेक रुग्ण हे आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षामुळे खासगी रुग्णालयांत औषधोपचारासाठी धाव घेत आहेत.
गावात आरोग्य प्रश्न बिकट बनलेला असतानाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. ग्रामपंचायतीच्या वतीनेही कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसल्याने मच्छरांचे साम्राज्य गावात वाढले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राच्या वतीने लवकरात लवकर उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट
कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनमुळे आरोग्य डाऊन
उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर आरोग्य कर्मचारी हे बाहेरगावी राहत असल्याने ते दररोज अपडाऊन करतात. त्यामुळे औषधोपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊन जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनमुळे गावकऱ्यांचे आजार वाढले आहे. यामुळे नागरिकही हैराण झालेले आहेत. या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट
सर्वेक्षण करून घेऊ
उंडणगावात जर रुग्ण वाढलेले असतील तर आरोग्यसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पाणी नमुने, रुग्णांचे रक्त नमुने आदी तपासण्या करण्यात येतील. गावात जी साथरोग असेल तिला आटोक्यात आणण्यासाठी माझ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जातील.
-डॉ. अर्चना सपकाळ, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, उंडणगाव
फोटो : आरोग्य केंद्राच्या इमारतीचा फोटो