तालुक्यातील जामगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्र. तीनमध्ये वितरित करण्यात येणारे गहू अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांनी तक्रार केली. यानंतर तलाठी बाळासाहेब ठोंबरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला असता, त्यांना नागरिकांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. सदरील गव्हात मोठ्या प्रमाणात धूळ व अळ्या आढळून आल्या. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत असताना, रेशन दुकानावर मात्र अतिशय खराब व प्राण्यांना खायला देण्याच्या लायकीचे नसलेले गहू वितरित करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. रेशनमार्फत खराब अन्नधान्य मिळत असेल तर ते त्वरित बदलून देण्याचे आदेश रेशन दुकानदारांना देण्यात आले आहे. असे असतानादेखील योग्य दर्जाचे धान्य देण्यास दुकानदार टाळाटाळ करीत असल्यास नागरिकांनी तक्रार करावी, असे पुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
गंगापुरात निकृष्ट धान्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:04 AM