औरंगाबाद : जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहार योजनेंतर्गत बालकांना निकृष्ट दर्जाच्या डाळींचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जि. प. आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी केलेल्या तपासणीत मूग डाळीच्या पाकिटावर पुरवठादाराचे नाव, एक्स्पायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, बॅच नंबर आदी कोणतीही माहिती नमूद नसल्याचे दिसून आले.
यासंदर्भात गलांडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ३ हजार ५१० अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटातील १ लाख २५ हजार ७७५ बालके असून, त्यांना कंत्राटदाराकडून पूरक पोषण आहार पुरवठा केला जातो. राज्यभरात पोषण आहाराच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण सहकारी संस्थेने तीन ठेकेदारांना नियुक्त केलेले आहे. या आहारांतर्गत बालकांना मसूर डाळ, मूग डाळ, तेल, मीठ, मिरची, हळद, चना, गहू आणि तांदूळ आदी साहित्य वाटप केले जात आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ठेकेदारांना २८ कोटी ७७ लाख १३ हजार ६०० रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचे गलांडे यांनी सांगितले.
पुरवठादाराने अंगणवाड्यांना दिलेली मुगाची डाळ निकृष्ट असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील महिलांनी केल्या होत्या, या तक्रारींच्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे अंगणवाडी क्रमांक-३ मध्ये जाऊन पोषण आहाराच्या धान्याची खातरजमा केली. तेव्हा मूग डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, पाकिटावर पुरवठादाराचे नाव, पाकिटे तयार केल्याची तारीख, डाळ वापराची मुदत, बॅच नंबर अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही. या घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करावी व संबंधित पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सभापती गलांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांच्याकडे केली आहे.
----चौकटी.................
निकृष्ट डाळींसंबंधी तक्रार करण्याच्या सूचना
यासंदर्भात महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, मागील आठवड्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून यासंबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जेथे जेथे अशाप्रकारच्या डाळी आढळून आल्या असतील, तेथे वाटप थांबविण्याचे आदेश दिले असून, फेडरेशनकडे त्याबाबत तक्रार नोंदविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.