भाववाढ : पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाने बजेट बिघडले
औरंगाबाद : मागील ३ ते ४ महिन्यांत पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे कोरोना व दुसरीकडे महागाई अशा दोन्ही संकटांशी नागरिकांना सामना करावा लागत आहे.
कोरोनापेक्षा वाढती महागाईची जास्त भीती वाटत असल्याचे लोकांनी सांगितले. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये भरडून निघालेल्या नागरिकांना आता महागाईचा सामना करावा लागत आहे.
मागील ४ महिन्यांत पेट्रोल लिटरमागे ७.०४ रुपये महागले. मंगळवारी ते ९८.४८ रुपये विकले जात होते. डिझेलमध्ये या काळात ६.०४ रुपयांनी भाववाढ होऊन ८९.५८ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
घरगुती गॅस सिलिंडरचे भाव ४ महिन्यांत १७५ रुपयांनी वाढून ७७८ रुपये झाले. त्यात ३ रुपये सबसिडी देऊन नागरिकांची अक्षरश: थट्टाच केली जात आहे.
ही महागाई आणखी भडकविण्याचे काम खाद्यतेलाने केले आहे. मागील चार महिन्यांत करडी व शेंगदाणा तेल वगळता सरकी तेल ५ रुपयांनी वाढून ११५ रुपये लिटर, सूर्यफुल ३० रुपयांनी वधारून १४० रुपये, पामतेल ३५ रुपयांनी वाढून १२० रुपये तर वनस्पती तूप २० रुपयांनी वाढून आजघडीला १२० रुपये किलो विकत आहे.
या भावावाढीने घरगुती बजेट बिघडले आहे, आणखी किती महागाई वाढणार याचीच चिंता सर्वसामान्यांना लागली आहे.
चौकट
कमाईपेक्षा खर्च वाढला
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले तर त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीत होतो. आता सर्वसामान्यांची कमाई कमी व खर्च वाढला आहे. घरखर्च व कमाईतील तफावत वाढतच आहे. हाच चिंतेचा विषय बनला आहे.
जीवनसिंग सिद्धू
कामगार
----
आमदानी घटली
लॉकडाऊन आधी रिक्षाला दररोज अडीच ते तीन लिटर पेट्रोल लागत असे आता प्रवाशांची संख्या घटली. सध्या दीड लिटर पेट्रोल लागते. पेट्रोलचे भाव वाढले, प्रवाशांची संख्या घटली, यात आमदानी कमी झाली. जे भाड्याने रिक्षा चालवतात त्यांचे आणखी हाल आहेत.
शेख मेहबूब
रिक्षाचालक