औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल व गॅस दरापाठोपाठ खाद्यतेलाच्या किमतीही वधारल्या आहेत. परिणामी महागाईचा भडका उडाला असून, पहिल्यांदाच सूर्यफूल तेलाचे प्रतिलिटर दर दीडशेपार गेले आहेत.
शेंगदाणा तेल १५० ते १५५ रुपये, सूर्यफूल तेल १४५ ते १५२ रुपये, सोयाबीन तेल १२५ रुपये, सरकी व पामतेल १२० रुपये प्रतिलिटर हे भाव वाचून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच जनता एवढ्या महागात तेल खरेदी करत आहे. मागील आठवडाभरात लिटरमागे पाच रुपयांनी खाद्यतेलात भाववाढ झाली आहे.
एरवी शेंगदाणा तेल व सूर्यफूल तेलाच्या किमतीमध्ये ३० ते ४० रुपयांची तफावत असे; पण सूर्यफूल तेलास एवढा भाव चढला की, शेंगदाणा तेलाच्या किमतीत ते विकले जात आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किमती वाढत आहेत. यामुळे या शुल्क कपातीचा परिणाम जाणवला नाही.
दुसरीकडे सोयाबीनवर प्रकिया करणाऱ्या उद्योगाकडून सोयाबीनला मागणी वाढल्याने सोयाबीनचे भावही वाढत आहेत. त्याचा परिणाम अन्य खाद्यतेलांवर होत आहे. नवीन करडई बीची आवक सुरू झाली असून, पुढील महिन्यात करडई तेलाचे भाव कमी होतील, अशी शक्यता जगन्नाथ बसय्ये यांनी वर्तवली आहे.
खाद्यतेल विक्रीत घटखाद्यतेलाच्या किमती वाढल्याने एकीकडे विक्रेत्यांचा लागत खर्च वाढला आहे, तर दुसरीकडे ग्राहकांनी हात आखडता घेतल्याने खाद्यतेलाची विक्री ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे.
खाद्यतेल किमती (लिटर) किमती
फेब्रुवारी मार्चशेंगदाणा तेल १५० रु. १५५ रु.सूर्यफूल तेल १४० रु. १५२ रु.सोयाबीन तेल १२० रु. १२५ रु.पामतेल ११५ रु. १२० रु.सरकी तेल ११५ रु. १२० रु.