: १० महिन्यांत लिटरमागे ४० ते ५० रुपयांची वाढ
औरंगाबाद : एरव्ही ५० ते ८० रुपये प्रतिलिटरदरम्यान विकणारे हलक्या प्रतीचे खाद्यतेल सध्या ११४ ते १४० रुपयांनी खरेदी करावे लागत आहे. मागील १० महिन्यांत लिटरमागे चक्क ४० ते ५० रुपयांनी खाद्यतेल वधारून महागाईचा आगडोंब निर्माण झाला आहे. यापूर्वी एवढी भाववाढ कधीच झाली नाही. फोडणीचा तडका महाग झाला तरी सर्वसामान्य ग्राहकांकडून खाद्यतेलाला मागणी कमी झाली नाही हे विशेष.
औरंगाबादमध्ये सुट्टे व पॅकिंगमधील खाद्यतेलाचा खप दररोज १५० टन आहे. यात ७० टक्के पॅकिंगमधील खाद्यतेल विक्री होते. सुट्टे तेल विक्री फक्त ३० टक्के राहिली आहे. मागणी जरी १५० टन असली तरी पुरवठा मात्र, ६० टनांपेक्षा कमी होत आहे. यामुळे खाद्यतेलाचे भाव वधारले आहेत. लॉकडाऊनआधी मार्च महिन्यात सूर्यफूल तेल ८८ ते ९० रुपये लिटर विकत होते आता चक्क १३५ ते १४० रुपये लिटर विकत आहे. म्हणजे मागील १० महिन्यांत लिटरमागे ४७ ते ५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सोयाबीन तेलात ४२ ते ४५ रुपये वाढून १२४ ते १२८ रुपये लिटर विकत आहे. सरकी तेलात ४२ ते ४३ रुपये भाववाढ होऊन १२२ ते १२५ रुपये प्रतिलिटर खरेदी करावे लागत आहे.
चौकट
सोयाबीन तेलाची सर्वाधिक विक्री
पॅकिंगमध्ये ७० टक्के सोयाबीन तेल विक्री होते. २० टक्के सूर्यफूल तेल व उर्वरित १० टक्क्यांमध्ये पामतेल, सरकी तेल, शेंगदाणा तेल व करडी तेल विकल्या जाते.
श्रीकांत खटोड
व्यापारी
-----
चौकट
उत्पादक देशांनी निर्यात शुल्क वाढविले
रशियाने सूर्यफुल तेलावर एकदम ३५ टक्के निर्यात शुल्क लावल्याने भाववाढ झाली. मलेशियाने शून्य वरून एकदम ८ टक्के निर्यात शुल्क लावली. अर्जेंटिना देशात बंदरात काम करणाऱ्या कामगारांचा संप मिटला आहे. तिथून सोयाबीन तेल जहाजाने भारतात येण्यास ४० ते ४२ दिवस लागतात. तसेच भारतात पावसाने सोयाबीन काळी पडले आहे. उतारा कमी मिळत आहे. यामुळे आवक कमी होऊन प्रचंड भाववाढ झाली.
राकेश पांडे
होलसेल व्यापारी