औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील बदलीपात्र शिक्षकांची माहिती संगणक प्रणालीत समाविष्ट करू देण्याची अंतरिम मुभा मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांनी दिली.
अहमदनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह शिक्षणाधिकाºयांना नोटीस बजाविण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. यावर एक आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले शिक्षक भाऊसाहेब जगताप व इतरांनी याचिका दाखल केली आहे. राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार शिक्षकाची बदली तीन वर्षांत व्हावी, असे नमूद केले आहे. संबंधित याचिकाकर्त्यांची ३१ मे २०१७ रोजी अवघड क्षेत्रात बदली झाली होती. तालुका व जिल्हास्तरावर संबंधितांचे नाव बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत नव्हते. त्यांची सेवा अवघड क्षेत्रात २ वर्षे ११ महिने, अशी संगणकात दाखविली जात होती. प्रत्यक्षात त्यांनी अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण केली आहेत. यामुळे त्यांना संगणकावर बदलीसाठी पर्याय देता येत नव्हता. संगणक त्यांचे नाव स्वीकारत नव्हते. याविरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
आपले नाव संगणक प्रणालीद्वारे समाविष्ट करून घेण्यात यावे. आपण बदलीस पात्र आहोत, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. खंडपीठाने संबंधितांना संगणकात माहिती दाखल करू देण्याची अंतरिम मुभा दिली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. रामेश्वर तोतला, अॅड. राहुल तोतला, अॅड. रामानंद करवा आणि अॅड. बी.एम. काटे यांनी काम पाहिले. राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.