औरंगाबाद : घटस्फोटित महिलेच्या नावे दहा बनावट फेसबुक खाते उघडून त्यावर तिचे अश्लील फोटो अपलोड करून बदनामी करणाºया उच्चशिक्षिताच्या सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नीलेश ज्ञानेश्वर दाभाडे (२०, रा. धूपखेडा, ता. पैठण), असे त्याचे नाव आहे.
पीडितेचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. कौटुंबिक वादातून कालांतराने तिचा घटस्फोट झाला. सहा महिन्यांपासून पीडिता उदरनिर्वाहासाठी खासगी नोकरी करते. संपर्कात राहण्यासाठी तिला वडिलांनी अॅण्ड्रॉईड मोबाईल घेऊन दिला. ११ फेबु्रवारी रोजी पीडितेला चुलत भावाने तिचे अश्लील फोटो व मेसेज फेसबुकवर अपलोड झाल्याचे सांगितले.
त्याशिवाय पीडितेचा मोबाईल क्रमांकदेखील होता. त्यावरून २५ फेब्रुवारी रोजी पीडितेने बिडकीन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी पीडितेचे बनावट फेसबुक खाते बंद केले. मात्र, त्यानंतरदेखील पुन्हा दुसरे खाते उघडून त्यावर पीडितेचा फोटो व मोबाईल क्रमांक टाकण्यात आला. पीडितेने पुन्हा १९ मार्च रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
यानंतर सायबर गुन्हे शाखेने बनावट फेसबुक खाते उघडणाºयाचा शोध सुरू केला. आधुनिक तंत्रज्ञानाआधारे शोध घेत सोमवारी सायबर गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक घुगे, उपनिरीक्षक मोहसीन सय्यद, जमादार कैलास कामठे, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप व गजानन बनसोड यांनी दाभाडेच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि साडेसातशे रुपये जप्त केले आहेत.