लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडविल्याने झालेल्या अपघातात ध्येयवेड्या तरूणावर काळाने घाला घातला. त्याच्यासोबत असलेली पत्नी जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे पत्नीला उच्चशिक्षित करण्याचे त्याचे स्वप्न अर्धवट राहिले. हा भीषण अपघात बुधवारी (दि.२७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पडेगाव रोडवरील एका ढाब्याजवळ घडला.विनोद शिवनाथ मानकापे (२६, रा. जातेगाव, ता. फुलंब्री, ह. मु. पुणे) असे मृताचे नाव आहे. तर कल्याणी विनोद मानकापे (२१) ही या अपघातात जखमी झाली. पोलिसांनी सांगितले की, विनोद हा पुणे येथे खाजगी कंपनीत संगणक आॅपरेटर होता.लग्नानंतर त्याने पत्नी कल्याणीचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरातील एका महाविद्यालयात एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ती शिक्षण घेत होती. कल्याणीला उच्चशिक्षित करण्याचे त्याचे स्वप्न असल्याने तो तिला अभ्यासासाठी सतत प्रोत्साहित करीत. खुलताबाद येथील एका महाविद्यालयात तिची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी पत्नीला ने-आण करण्यासाठी विनोद मंगळवारी औरंगाबादेतील सासुरवाडीत आला होता. सहा महिन्याचे बाळ सिडको एन-१३ येथील सासुरवाडीत ठेवून आज सकाळी दोघे पती-पत्नी दुचाकीने शहरातून खुलताबादला जात होते. पडेगावजवळील ढाब्याजवळ समोरून येणाºया ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात विनोद आणि कल्याणी हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी विनोद यास तपासून मृत घोषित केले. कल्याणीवर उपचार सुरू आहे. हा अपघात छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने छावणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाईला सुरुवात केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली.वडिलांचे छत्र हरपलेविनोद आणि कल्याणी या दाम्पत्याला सहा महिन्याचे तान्हुले बाळ आहे. बाळाला थंडीचा त्रास होईल, म्हणून त्यास घरी ठेवले आणि हे दाम्पत्य दुचाकीने खुलताबादला जाऊ लागले. आजच्या अपघाताने त्या बाळाच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले.
ट्रकच्या धडकेत पती ठार, पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:41 AM