औरंगाबाद : अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची मोटारसायकल पळविणाऱ्या चोरट्याला सिडको पोलिसांनीअटक केली. चोरट्यांकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या.
विजय कल्याण दिवेकर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, नारेगाव परिसरात एक जण चोरीच्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, कर्मचारी नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुभाष शेवाळे, दिनेश बन, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, किशोर गाडे, लाला पठाण यांच्या पथकाने आरोपी विजयला पकडले.
त्याच्याकडील दुचाकीविषयी चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. कसून चौकशीअंती त्याने आंबेडकर चौकात काही दिवसांपूर्वी तुकाराम किसन राठोड (रा. शिवशंकर कॉलनी) यांचा अपघात झाला होता. यात राठोड जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांची मोटारसायकल चोरून नेल्याची कबुली दिली. याविषयी राठोड यांनी सिडको ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार नोंदविली होती. ही मोटारसायकल घेऊन नाशिक येथे गेल्यानंतर तेथील पोलिसांनी दुचाकीसह पकडले असता मोटारसायकलची कागदपत्रे घेऊन येतो, असे सांगून तेथून आलो आणि परत नाशिकमध्ये गेलोच नसल्याचे त्याने सांगितले.
यानंतर पोलिसांचे पथक त्याच्यासह नाशिक येथे गेले आणि चोरीची मोटारसायकल जप्त करून घेऊन आले. शिवाय आरोपीने अन्य एक चोरीची मोटारसायकल नारेगाव परिसरातील साईनगर येथील घरात लपवून ठेवली होती. ही मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.