औरंगाबाद: दारुच्या नशेत दोन तरुणामध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाला एका पोलिसाने लाठीने मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात घडली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार धुलीवंदननाच्या निमित्ताने गणेशनगर येथील रहिवासी सुनील मुरलीधर मगर आणि सोनू घोरी हे त्यांच्या नातेवाईकांसोबत रंग खेळत होते. यावेळी परस्परांकडे पाहण्यावरुन त्यांच्यात भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात सुनीलचे डोके फुटले. या घटनेनंतर तो जखमी अवस्थेत तक्रार देण्यासाठी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गेला. तेव्हा तेथील पोलीस अधिकाऱ्याने त्याला मेडिकल मेमो देउन घाटीत उपचार घेण्यासाठी जाण्याचे सांगितले. त्याच वेळी तेथे घोरी तक्रार करण्यासाठी आला होता. तेव्हा सुनील याने आरोपीवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवा अशी मागणी करू लागला.
यावेळी घोरीचा ओळखीचा पोलीस कर्मचारी दिपक जाधव यांनी त्याला तू जसा गुन्हा दाखल करशील तसाच गुन्हा तुझ्यावर नोंदविला जाईल असे सुनीलला सांगितले. जाधव हे घोरीच्या बाजूने बोलत आहेत. हे लक्षात आल्यावर त्याने त्यांना शिवी दिली. याचा राग आल्यावर जाधवने त्याला लाठीने मारहाण केली. यावेळी अन्य पोलिसांनी हे भांडण सोडविले. पोलीस ठाण्यात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हा शिमगा सुरू होता. या नंतर त्यांने घाटीत जाऊन उपचार घेतले. याप्रकरणी सुनील मगर आणि घोरीचे नातेवाईक रामपाल बनारशी भूपंक यांच्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले. सुनीलच्या तक्रारीवरुन सोनू घोरी, जोगिंदर घोरी, अनिकेत घोरी आणि सनी घोरी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तर रामपाल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सुनील मगर, नितीन ससाणे, गणेश जैस्वाल आणि कृष्णामगर विरूध्द गुन्हा नोंदविला.