औरंगाबाद : पीएच.डी. तसेच एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून ‘राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप’ तसेच ‘बार्टी’ मार्फत फेलोशिप दिली जाते. सारथी’ने दुजाभाव न करता पात्र विद्यार्थ्यांना पीएच.डी. तसेच एम.फिल.च्या प्रवेश दिनांकापासून ती दिली पाहिजे, असा सूर राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये उमटला आहे.
‘सारथी’मार्फत सन २०१८ पासून मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी या प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप (अधिछात्रवृत्ती) दिली जाते. सप्टेंबर २०१९ मध्ये या फेलोशिपसाठी जाहिरात आली होती. जाहिरातीनुसार ३० जानेवारी २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तत्पूर्वी, ‘सारथी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत या ५०२ जागांना मान्यताही देण्यात आली. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ‘सारथी’ मार्फत कसल्याही हालचाली झाल्या नाहीत. वर्षभरानंतर २३ डिसेंबर २०२० रोजी कागदपत्रांची पडताळणी करून पात्र ३४२ विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर २३ ते २७ मार्च २०२१ दरम्यान पुणे येथील ‘सारथी’च्या कार्यालयात २४१ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधनकार्याला आता दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे; पण अद्यापही त्यांची फेलोशिपकरिता निवड जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, विद्यार्थ्यांची ज्या दिवशी फेलोशिपसाठी निवड होईल, तेव्हापासून ती देण्याचा निर्णय या कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे.
चौकट.....
यासंदर्भात संशोधक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी महावीर चव्हाण यांनी सांगितले की, आर्थिक विवंचनेमुळे अनेक मराठा किंवा कुणबी प्रवर्गाचे तरुण उच्चशिक्षणापासून वंचित राहत आहेत. ‘सारथी’ देत असलेल्या फेलोशिपच्या भरवशावर अनेक विद्यार्थी संशोधनकार्य करत असून दोन वर्षे झाली, तरी अद्यापही त्यांना फेलोशिप देण्यात आलेली नाही, ही खेदजनक बाब आहे. मुलाखत देणाऱ्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्यात यावी व ती विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये संशोधनकार्यासाठी प्रवेश घेतलेल्या दिनांकापासून द्यावी, अन्यथा ‘सारथी’ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.