छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण, संशोधन केलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांची सचित्र माहिती असणारी पुस्तिका लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (आयक्वॅक) संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी सांगितले. त्यासाठी पाच नावांची माहिती पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
विद्यापीठाची २३ ऑगस्ट १९५८ रोजी स्थापन करण्यात आली. दोन विभागावर सुरू झालेल्या विद्यापीठाचा विस्तार आता ५५ विभागांवर पोहोचला आहे. मुख्य परिसरात ४५ विभाग असून, धाराशिव उपपरिसरात १० उपविभाग आहेत. गेल्या ६६ वर्षांत अनेक विद्यार्थी संशोधकांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. यामध्ये शिक्षण, संशोधन, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, राजकारण, प्रशासन, चित्रपट आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
अशा सर्व माजी विद्यार्थ्यांची सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याचे काम विद्यापीठाने हाती घेतले आहे. त्यासाठी कुलगुरू, प्रकुलगुरू आणि कुलसचिवाच्या मार्गदर्शनात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. गुलाब खेडकर, प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गिरीष काळे व डॉ. आर. के. प्रिया यासाठी प्रयत्नशील आहेत. विद्यापीठ लवकरच नॅकच्या चौथ्या सायकलला सामोरे जात असून, स्वयं मूल्यमापन अहवाल (एसएसआर) बनविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठ मुख्य परिसर व उपपरिसरातील विभागप्रमुखांनी येत्या ३१ मे पर्यंत आपल्या नामांकित किमान पाच विद्यार्थ्यांची माहिती पाठवावी, असे आवाहनही डॉ. खेडकर यांनी केले आहे.