औरंगाबाद : घाटी रुग्णालयात स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या झालेल्या मृत्यूची राज्य शासन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयने ( डीएमईआर) गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, १ फेब्रुवारी रोजी चौकशी करणार आहे.
छावणी परिसरातील एका महिलेला २१ जानेवारी रोजी रात्री प्रसूतिकळा सुरू झाल्या. तेव्हा कुटुंबियांनी महिलेला प्रारंभी छावणी रुग्णालयात नेले. याठिकाणी महिलेला प्रसूतिकळा नसल्याचे सांगून दोन गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर सदर महिलेला कुटुंबियांनी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास घाटीत आणले.
अपघात विभागातून काही पायऱ्या चढून समोरील व्हरांड्यातील लिफ्टपर्यंत पोहोचत नाही तोच महिलेची अचानक प्रसूती झाली आणि नवजात बाळ थेट फरशीवर पडले. स्ट्रेचरवरून वॉर्डात नेताना जर प्रसूती झाली असती, तर बाळ खाली पडले नसते. त्यामुळे स्ट्रेचरचा वापर केला असता तर ते सुखरूप राहिले असते, असे घाटीतील काही डॉक्टरांनी म्हटले. ही संपूर्ण घटना ‘लोकमत’ने सविस्तर समोर आणल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक चौकशी करण्यात आली.
कारवाईकडे लक्षप्राथमिक चौकशीत घटनेच्या दिवशी कर्तव्यावर हजर असलेल्या डॉक्टरांपासून तर चतुर्थश्रेणी अशा दहा जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या. यानंतर या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली. आता ‘डीएमईआर’कडूनही घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेला जबाबदार धरून रुग्णालय आणि प्रशासनातील दोषींची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.