- प्रभात बुडूख
बीड : बीड व जालना जिल्ह्यांतील अवैध वाळूसाठाप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. या आदेशासोबत त्यांनी या अधिकाऱ्यांची नावेही दिली आहेत.
या दोन्ही जिल्ह्यांतील अवैध वाळूसाठा प्रकरण सध्या अधिवेशनात गाजत आहे. बीड व जालना जिल्ह्याच्या सीमेवरून गोदावरी नदीपात्रातून रोज हजारो ब्रास वाळू चोरी करून शासनाचा महसूल बुडवला जात आहे. या अवैध वाळू उत्खननामुळे पार्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. अवैध वाळू वाहतूक व साठेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून आ. विनायक मेटे यांनी केली होती.
या सर्व अवैध धंद्याला अधिकाऱ्यांचे पाठबळ असून, ते हप्ते घेतात असा आरोपदेखील मेटे यांनी केला होता. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अशा अधिकाऱ्यांची यादी द्या, त्यांची चौकशी करून कारवाई करू असे सांगितले होते. पाठोपाठ मेटे यांनी अशा अधिकाऱ्यांची यादी महसूलमंत्र्यांना एका पत्राद्वारे पाठविली होती. ही यादीच केंद्रेकर यांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भातील अहवाल २७ जूनपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करावा, असेही केंद्रेकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.