औरंगाबाद : लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली आहे. समितीने गुरुवारपासून चौकशी सुरू केली असून, सात दिवसांत आरोग्य विभागाला अहवाल सादर करणार आहे.चौकशीत पारदर्शकता राहण्यासाठी सहा सदस्यांच्या या समितीमध्ये अन्य जिल्ह्यांतील जिल्हा शल्यचिकित्सकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत असलेल्या औषधी साठ्याची पडताळणी या समितीकडून केली जात आहे. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाच्या भांडार तपासणी पथकाने आरोग्य उपसंचालकांना दिला. यानंतर आणखी ९० लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याची माहिती मिळाली आहे. हा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला.शासनाच्या भांडार पडताळणी अधिकाºयांच्या पथकाने सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाची चौकशी केली असता हे विदारक सत्य समोर आले. पथकाने त्वरित संपूर्ण औषधींचा पंचनाम केला. या पथकाने दिलेल्या अहवालानुसार असलेल्या बाबींची चौकशी समितीकडून पडताळणी सुरू आहे. औषधी साठ्याची पडताळणी करून समिती अहवाल तयार करणार आहे. आगामी पाच दिवसांत ही समिती आरोग्य विभागाला अहवाल सादर करील.शासनाच्या भांडार पडताळणी पथकाने दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर त्वरित जबाबदारी निश्चित करून शासनाला अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस आरोग्य उपसंचालकांना केली आहे. चौकशीतून ही जबाबदारी निश्चित होईल. या समितीच्या अहवालानंतर कोणावर कारवाई होईल, याकडे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबादेतील कालबाह्य औषधांची चौकशी; सात दिवसांत देणार अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:33 AM