लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारी असलेल्या पतीनेच शवविच्छेदन केलेल्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे; परंतु चौकशीचा अहवाल अधिष्ठातांपर्यंत अद्यापही पोहोचलेला नाही. याप्रकरणी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्याचा खटाटोप सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.घाटी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी असलेला पतीच पत्नीच्या नावाने शवविच्छेदन करीत असल्याचे ‘लोकमत’ने २९ आॅगस्ट रोजी चव्हाट्यावर आणले. त्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर व तात्काळ दखल घेत न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख के. यू. झिने यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना अधिष्ठातांनी केल्या होत्या.मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्यास शवविच्छेदन अहवालातून त्याचे कारण स्पष्ट केले जाते. रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन विभागात मृतांचे शवविच्छेदन केले जाते. निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. विकास राठोड यांनी पत्नी डॉ. अश्विनी राठोड यांच्या नावे दिवसभर शवविच्छेदन केले. दिवसभरात शवविच्छेदन प्रक्रियेत कुठेही सहभाग नसलेल्या डॉ. अश्विनी राठोड यांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात दाखल होत शवविच्छेदन अहवालांवर स्वाक्षºया केल्याचेही दिसून आले. ‘पत्नीच्या नावे पतीच करतोय शवविच्छेदन’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या सगळ्या प्रकाराविषयी गेल्या चार दिवसांत चौकशी करण्यात आली आहे.यामध्ये शवविच्छेदनगृहात भेट देऊन अधिकाºयांनी सर्व बाजूंनी चौकशी पूर्ण केली आहे. त्यासंदर्भात अहवालही तयार झालेला आहे; परंतु अद्यापही चौकशीचा हा अहवाल वरिष्ठांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे चौकशीतून नेमके काय समोर आले, हे वरिष्ठांना कळू शकलेले नाही.
चौकशी पूर्ण, अधिष्ठातांना अहवाल मिळालाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:41 AM