बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी लटकल्यानंतर ११ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशीही बारगळल्याचे समोर आले. या दोन्ही दंगलींची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना दिले होते. दोन्ही दंगलीत शहर होरपळले असताना मुख्यमंत्री आणि गृहखाते मात्र या दंगलींबाबत असंवेदनशील असल्याचे दिसते.जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान शहरात लहान-मोठ्या चार दंगली झाल्या. यातील सर्वात भीषण अशी दंगल ११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात झाली. या दंगलीत दोन जणांचा बळी गेला, तर शेकडो जण जखमी झाले. शिवाय दहा कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. या दंगलीप्रकरणी सुमारे तीन ते चार हजार लोकांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. दोन समुदायांतील दंगलीने शहरातील सामाजिक सलोख्याला धक्काच बसला. या दंगलीची चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांच्या मार्फत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.बुधवारी दंगलीला २६ दिवस पूर्ण झाले; मात्र दंगलीची चौकशी करणारी पोलीस महासंचालकांची उच्चस्तरीय चौकशी समिती अद्याप शहरात आली नाही.७ मार्च रोजी मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करण्यासाठी दगड हातात घेऊन रस्त्यावर आलेले नागरिक आणि त्यांना हुसकावण्यासाठी गेलेल्या पोलिसांत जोरदार धुमश्चक्री झाली होती. या घटनेचेही तीव्र पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले होते. मात्र या दंगलीची चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ही चौकशी आता बारगळल्यातच जमा आहे.दोन्ही दंगलीत शहरातील नागरिक होरपळले असताना आणि नागरिकांचा जीव गेला असतानाही सरकार आणि गृहखाते मात्र असंवेदनशील असल्याचे दिसत आहे.मुख्यमंत्र्यांच्या घोषणांची अंमलबजावणी कधीलोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी अतिरिक्त गृहसचिव, पोलीस महासंचालक यांच्यामार्फत करण्याची घोषणा केली. रजेवर गेलेले तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना पुन्हा औरंगाबादेत रुजू होऊ न देता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. या घटनेला आज तीन महिने पूर्ण होत असले तरी मिटमिटा दंगलीची चौकशी करणारी समिती शहरात आली नाही. मिटमिट्यापाठोपाठ आता गत महिन्यात जुन्या शहरातील दंगलीची चौकशीही बारगळल्याचे चित्र दिसू लागले आहे.
औरंगाबाद येथील दंगलींची चौकशी बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 11:59 PM
तीन महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी लटकल्यानंतर ११ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशीही बारगळल्याचे समोर आले
ठळक मुद्देमिटमिट्यासह शहरात वणवा : शहरवासी होरपळले असताना गृह विभाग मात्र असंवेदनशील