लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष मदतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मागील अडीच वर्षात यातील २३ कोटीचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. मात्र या निधीची उधळपट्टी केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या अभियानांतर्गत खर्च केलेल्या सर्व निधीची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भूम येथील आढावा बैठकीत दिले. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबतही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या विभागाच्या कामकाजाचीही चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.भूम, वाशी तालुक्यातील विविध कामांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूम येथील आलमप्रभू देवस्थानमधील सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासह आमदार सुजीतसिंह ठाकूर, राणाजगजितसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, ज्ञानराज चौगुले, राज्याचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णा गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकास योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता असलीच पाहिजे, औपचारीकता म्हणून कामांचे परीक्षण पडताळणी करु नका, निधीचा विनीयोग योग्य रितीने होण्यासाठीची ही व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत त्यांनी जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, पीक कर्ज पुनर्गठन, राष्ट्रीय दुग्धविकास प्रकल्प, बळीराजा चेतना अभियान, मुख्यमंत्री सडक योजना तसेच तूर खरेदी आदींचा आढावा घेतला. सध्या तूर खरेदीची प्रक्रिया सुुरु आहे. ती खरेदी वेळेत पूर्ण करण्यासाठी जादा काटे लावा अशी सूचना करतानाच खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित गैरव्यवहारांच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी निधी वापरण्याच्या अनुषंगाने यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवा, असे निर्देश त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार्डी येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळे, प्लास्टीक अस्तरीकरण कामाचा धनादेश लाभार्थी शेतकरी बालाजी चौधरी यांना प्रदान करण्यात आला. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत वाशी तालुक्यामध्ये २७३ शेततळ्यांचा लक्षांक असून, ३३८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ३२५ अर्जांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, १४५ शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत १६५ शेततळ्याचे काम सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर भूम तालुक्यातील आरसोली येथे मुख्यमंत्र्यांनी ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची पाहणी केली. याच ठिकाणी त्यांनी आरसोली, देवळाली, तांबेवाडी या रस्त्याचे फीत कापून उद्घाटन केले.
बळीराजा अभियानाची होणार चौकशी
By admin | Published: May 14, 2017 12:43 AM