औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना दिले. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन आणि विद्यमान आयुक्त ओम प्रकाश बकोरियांच्या कार्यशैलीवर पालकमंत्र्यांनी ताशेरे ओढले. ‘लोकमत’ ने हा घोटाळा चव्हाट्यावर आणला आहे. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी आला. गाळ आणि खर्च यावरून विभागीय प्रशासन आणि पालिका प्रशासनाची सदस्यांनी उलटतपासणी केली. शासनाने दोन वर्षांपूर्वी तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याच वेळी तो निधी मनपाकडे वर्ग झाला होता. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या. ३५० रुपये क्युबिक मीटरप्रमाणे गाळ काढण्यासाठी दर निविदा तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी मंजूर केली. मुळात आजघडीला २५ ते ३० रुपये प्रतिक्युबिक मीटर गाळ काढण्यासाठी खर्च येत असताना मनपाने ३५० रुपये का दिले, असा सवाल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. शेतकरी गाळ स्वत:हून घेऊन जाण्यास तयार असतात. मनपाने फक्त तो काढून देणे गरजेचे होते; परंतु तसे न करता २ कोटी रुपयांची विल्हेवाट लावण्यासाठी ही रक्कम गाळात घातली काय, असा सवाल आ. सुभाष झांबड यांनी केला. डीपीडीसीच्या बैठकीत फक्त चर्चा होते. आजवर कुणावरही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आ. अतुल सावे म्हणाले, कंत्राटदारांनी गाळ विकला आहे. त्याला डबल फायदा या कामातून झाला आहे. आ. शिरसाट म्हणाले, ३५ ते ४० कोटी रुपये खर्च येत असताना २ कोटी रुपयांत तलाव गाळमुक्त कसा होणार. महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, यासाठी निधी कुठून आला आणि त्याचे नियोजन कसे झाले हेदेखील प्रशासनाने सांगावे. विभागीय आयुक्त डॉ.दांगट म्हणाले, २ वर्षांपूर्वी शासनाने २ कोटी रुपये दिले होते. तेव्हा मनपाने आजवर त्या कामाला सुरुवात केली नाही. टंचाई असल्यामुळे गाळ काढण्यासाठी मनपाकडे आग्रह धरला. तलावाचे क्षेत्र ३०० हेक्टर आहे. या प्रकरणात मनपाला चौकशीचे आदेश दिले आहेत. आयुक्त बकोरिया म्हणाले, चौकशी करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी गाळ काढण्याचे कंत्राट का तपासले नाही. त्याच कंत्राटदाराला सध्या काम का दिले. तत्कालीन आयुक्तांनी निविदा तपासल्या नाहीत. विद्यमान आयुक्तांनी निविदा का तपासल्या नाहीत.४दोन वर्षांपूर्वीचा व्यवहार कायदेशीररीत्या योग्य आहे की नाही हे आयुक्तांना का तपासावे वाटले नाही. दोन्ही आयुक्तांची या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, असे माझे मत आहे. दांगट यांनी चौकशी करावी, असे आदेश पालकमंत्री कदम यांनी दिले.‘मनपाने गाळ खाल्लाच’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून मनपा आणि विभागीय प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. सोमवारी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ.सुभाष झांबड, आ.संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे यांनी लोकमतच्या वृत्तावरून मनपा आणि विभागीय प्रशासनाची झाडाझडती घेतली. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश देऊन गाळात कोणकोण अडकले आहेत, याचा अहवाल देण्यास सांगितले.
गाळ खाणाऱ्यांची चौकशी
By admin | Published: May 31, 2016 12:32 AM