औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सर्व उड्डाणपुलांची तपासणी करुन १८ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ( Aurangabad High Court) न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी ११ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद महापालिका ( Aurangabad Municipal Corporation ) आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ( Goverment Engineering College ) यांना दिले आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेसंदर्भात ॲड. रुपेश जैस्वाल यांनी व्यक्तीश: दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. शिवाजीनगरचा भुयारी मार्ग आणि शहरातील १२ रस्त्यांसंदर्भात २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
खंडपीठाच्या पूर्वीच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकालगतच्या उड्डाणपुलाचा तपासणी अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. गणेश केशवराव पाटील यांनी खंडपीठात सादर केला. या उड्डाणपुलावर नुकताच महापालिकेने डांबराचा थर टाकला आहे. रस्त्यावरील डांबरीकरणाची जाडी ८० मि. मी. असायला हवी, परंतु येथे ती ५० मि. मी.च आहे. ९० टक्केच काम झाले आहे. या रस्त्यावर गंभीर त्रुटी आहेत. रस्त्यावर थर्मोप्लास्टिक पेन्ट, कॅट आईज आणि रम्बल स्ट्रीप (स्पीड ब्रेकरवरील रबरी पट्ट्या) लावलेल्या नाहीत, असे ॲड. एस. एस. गंगाखेडकर यांनी शपथपत्राआधारे खंडपीठाच्या निदर्शनाला आणून दिले असता, खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
शिवाजीनगरचा भुयारी मार्ग- सद्य:स्थितीशिवाजीनगरच्या भुयारी मार्गाच्या खर्चाला आर्थिक संमती द्या, असे निर्देश खंडपीठाने राज्य शासन आणि रेल्वे बोर्डाला १७ जुलै रोजी दिले आहेत. या दुहेरी भुयारी मार्गामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. शिवाजीनगर येथील दुहेरी भुयारी मार्गाच्या कामाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. या मार्गास प्रत्येकी अडीच कोटी असे एकूण ५ कोटी रुपये खर्च रेल्वेला येणार असल्याचे आणि संपूर्ण कामाला ३६.६० कोटी खर्च येणार असल्याचे ॲड. मनीष नावंदर यांनी रेल्वे बोर्डातर्फे खंडपीठाला सांगितले होते. येथील एका बाजूचा भुयारी मार्ग रेल्वे आणि दुसरा महापालिका तयार करणार आहे. यासाठी भूसंपादनाची कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली असून शासनाकडून आर्थिक मंजुरी मिळताच काम सुरु होईल, असे महापालिकेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी सांगितले होते. शासनाच्यावतीने राज्य रस्ते महामंडळ निम्मे काम करणार असल्याचे जागतिक बँकेचे कार्यकारी अभियंता नरसिंग भांडे यांनी शपथपत्रात म्हटले होते.
शहरातील या १२ रस्त्यांसंदर्भात होणार सुनावणीमहापालिकेतर्फे विविध योजनांतर्गत तयार केलेल्या शहरातील १२ रस्त्यांची ‘त्रयस्थ पाहणी’ (थर्ड पार्टी इन्स्पेक्शन) करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिले होते. त्यात १. दीपाली हॉटेल ते जयभवानी चौक रस्ता २. जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकापर्यंतचा रस्ता ३. जालाननगर रेल्वे उड्डाण पुलावरील रस्ता ४. व्होक्हार्ट ते नारेगाव रस्ता ५. रेल्वेस्थानक ते तिरुपती एन्क्लेव्ह पर्यंतचा रस्ता ६. पुंडलिकनगर ते कामगार चौक रस्ता ७. एन-२ भवानी पेट्रोलपंप ते ठाकरेनगर रस्ता ८. महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी ९. जालना रोड ते ॲपेक्स हॉस्पिटल १०. अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साईज रस्ता ११.जळगाव रोड ते अजंटा ॲम्बेसडर पर्यंतचा रस्ता १२. अमरप्रीत हॉटेल ते एकता चौक पर्यंतचा रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे.