केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, आलापूर, बेलोरा, पेरजापूर या नव्याने झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी पाहणी करून आढावा घेतला. केदारखेडा, आलापूर, बेलोरा, पेरजापूर आदी ठिकाणी नवीन कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहे़ ही कामे जवळपास पूर्णत्वाकडे जात आहेत. केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे काम पूर्ण झालेले असल्यामुळे या बंधाऱ्यात पावसाळ्यापूर्वी पाणी साठविण्यासाठी लघु जलसंधारण विभाग सज्ज झाला आहे़ परंतु त्यापर्वी सर्व बाजुने हे बंधारे सक्षम आहेत की नाही, यासंबंधिचा आढावा नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाच्या पथकाने घेतला. या बंधाऱ्यात पाणी साठल्यानंतर परिसरातील जमिनींना फायदा होऊ शकतो. झालेल्या कामाबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले. पथकात कार्यालयाचे एसक़े. चौधरी, महमंद शफी, संतोषकुमार, लघु पंकज सिंगतकर, कनिष्ठ अभियंता आऱ के़ जाधव, अबांदास सहाणे आदींचा समावेश होता़ रमेश मुरकुटे, मधुकर ताबंडे, के़बी़जाधव, कल्याण जाधव, संचित जाधव, श्रीराम ताबंडे, जगन ताबंडे या शेतकऱ्यांनी बंधाऱ्यांची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थही उपस्थित होते. (वार्ताहर)
नागपुरच्या पथकाकडून कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 12:54 AM