वाळूज महानगर : वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जानकीदेवी बजाज फाैंडेशनच्यावतीने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या नियोजित प्रकल्पाची पाहणी सोमवारी आ. अंबादास दानवे व आरोग्य विभागाच्या पथकाने केली.
सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून रुग्णांची संख्याही वेगाने वाढत चालली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे व्हेंटिलेटरवर असणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची परवड होत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत जानकीदेवी बजाज फाैंडेशनच्यावतीने तसेच आ. अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी दुपारी १ च्या सुमारास आ. अंबादास दानवे यांनी या नियोजित प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कांबळे, नोडल अधिकारी डॉ. उज्ज्वल चव्हाण, वाळूजच्या सरपंच सईदाबी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, माजी सभापती मनोज जैस्वाल आदींची उपस्थिती होती.
आठवडाभरात हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्यामुळे वाळूजसह औद्योगिक क्षेत्रातील कोरोना रुग्णांची परवड थांबणार आहे. यावेळी वाळूज ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, ईस्माईल पठाण, राहुल भालेराव, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे, नंदकुमार राऊत, उत्तम बनकर, सौरभ वैद्य, जोगेश्वरीचे सामाजिक कार्यकर्ते अमोल लोहकरे, ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव, रांजणगावचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ-
जानकीदेवी बजाज फाैंडेशनच्यावतीने वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील नियोजित ऑक्सिजन प्रकल्पाची पाहणी करताना आ. अंबादास दानवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ व शिवसेनेचे पदाधिकारी दिसत आहेत.
फोटो क्रमांक- पाहणी १/२/३
--------------------------