वाळूज महानगर : वाळूज महानगरातील पाच खाजगी रुग्णालयांतील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची (डीसीएचसी) मंगळवारी (दि.२४) आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. या पाहणीत पथकाने या सेंटरमधील सुविधांचा आढावा घेतला.
बजाजनगरातील अष्टविनायक, लीलासन, घृष्णेश्वर, सिडको वाळूज महानगरातील वाळूज हॉस्पिटल व पंढरपुरातील तिरुपती हॉस्पिटल या रुग्णालयांनी जिल्हा परिषदेकडे डीसीएचसी सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी या सेंटरला परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे संचिका पाठविली होती. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हा कृती दल समितीसमोर हा विषय ठेवून खाजगी रुग्णालयात डीसीएचसी सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी बेड, व्हेंटिलेटर, तज्ज्ञ स्टॉफ आदी सुविधांची पूर्तता खाजगी रुग्णालयांनी केली आहे का, याची तपासणी करण्यासाठी पथक स्थापन केले आहे. दरम्यान, तपासणीत अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये ४५ बेड, ४ व्हेंटिलेटर, तिरुपती हॉस्पिटलमध्ये ३ व्हेंटिलेटर, ५० बेड, लीलासन हॉस्पिटलमध्ये ५० बेड व २ व्हेंटिलेटर असल्याचे दिसून आले.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल पाठविणार
तपासणी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांना पाठविण्यात येणार आहे. या अहवालानंतर सर्व अत्याश्यक सुविधा उपलब्ध असणाऱ्या व अटींची पूर्तता करणाऱ्या खाजगी रुग्णालयांना डीसीएचसी सेंटर सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे डॉ. कुडलीकर यांनी सांगितले.
-------------------