औरंगाबाद : मोठा गाजावाजा करून मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बसपोर्ट उभारण्याची घोषणा केली; परंतु दोन वर्षांत निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता सिडको बसस्थानकावर बसपोर्ट बांधण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. याठिकाणी बसपोर्ट बांधण्यासाठी मोठा गुंतवणूकदार मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. आजघडीला बसस्थानकाची पार दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अत्याधुनिक बसस्थानकाची औरंगाबादकरांना प्रतीक्षा लागली आहे, अशा परिस्थितीत २०१६ मध्ये बसपोर्ट बांधण्याची घोषणा झाली. यासाठी बसपोर्टचा नकाशा तयार करण्यात आला आहे. मात्र, या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनही अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. याठिकाणी बसपोर्ट बांधायच्या निविदेला येथून अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने खासगी भांडवलदार निविदा भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसटी. महामंडळाने आता सिडको बसस्थानकावर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सिडको आणि आजूबाजूच्या परिसराचा चांगला विकास झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक महत्त्वाच्या गोष्टी या भागात आहे. त्यामुळे या जागेवर बसपोर्टची बहुमजली इमारत बांधून त्यातून उत्पन्न तर मिळण्याची शक्यता आहे. ही तयारी करताना किमान या ठिकाणी तरी आता मोठा गुंतवणूकदार मिळेल,अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरणमध्यवर्ती बसस्थानकाऐवजी सिडकोत बसपोर्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठे गुंतवणूकदार आले पाहिजेत. एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट केले जाईल. मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न केला जाईल.-रणजितसिंह देओल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ