- सचिन लहानेछत्रपती संभाजीनगर : लग्नाची घटिका काही मिनिटांवर आलेली असतानाच अचानक सोसाट्याचा वारा, वादळासह जोरात पाऊस आला. या पावसाने मंडपाचे होत्याचे नव्हते करून टाकले. मंडप उडून गेला. वऱ्हाडींची धावपळ उडाली. ही घटना घडली शहराजवळील गांधेली गावात.
गांधेलीतील तळेकर कुटुंबातील मुलीचा लाडसावंगी येथील गाडेकर यांच्या मुलासोबत आज विवाह होता. लग्नासाठी दोन्हीकडील नातेवाईक मंडळी जमली होती. लग्न लागण्याच्या ऐन मुहूर्तावरच विनानिमंत्रित अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाहता पाहता मांडवावर पाऊस बरसू लागला. त्यात वाऱ्याने मांडवाचे नुकसान केले. मंडपात सगळीकडे पाणीच पाणी साचले. लग्नाच्या मुहूर्तावर झालेल्या अवकाळीमुळे वऱ्हाडींना इतरत्र आसरा शोधावा लागला. वऱ्हाडीची धावपळ पाहून गावातील अनेकांनी घराची दारे उघडून पाहुण्यांना आश्रय दिला. लग्नास बनविलेले पंचपक्वानही अवकाळी पावसात वाहून गेले, अवकाळीचे संकट निघून गेल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता नियोजित विवाह थाटात पार पडला. यात गावकऱ्यांनी दाखविलेले एकीचे दर्शन सर्वांच्या मनाला भावले.