औरंगाबाद : येथील चिकलठाणा विमानतळावर रविवारी वेगळेच राजकीय नाट्य घडले. आ. संजय शिरसाट यांच्या आलिशान गाडीला डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या वाहनात बसणे पसंत केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
बिडकीन येथे आयोजित निरंकारी संत सत्संगास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे खास विमानाने रविवारी औरंगाबादेत आले होते. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह सहकारमंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आदी उपस्थित होते.
सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्यांमध्ये संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे औरंगाबाद जिल्ह्यातील हे पाच आमदार आघाडीवर होते. मात्र, मंत्रिमंडळात भुमरे आणि सत्तार यांचाच नंबर लागला. तेव्हापासून शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे.
एक नंबरऐवजी नऊ नंबरला पसंती!मुख्यमंत्र्यांसाठी आ. शिरसाट यांची ‘१ नंबर’ क्रमांकाची चाॅकलेटी रंगातील ‘लॅण्ड रोव्हर’ तर भुमरे यांची ‘नऊ नंबर’ची पांढऱ्या रंगाची त्याच कंपनीची अशा दोन आलिशान गाड्या विमानतळावर सज्ज होत्या. पोलिसांनी दोन्ही गाड्यांना ‘क्लिअरन्स’ दिला होता; पण शिंदे यांनी भुमरेंच्या चारचाकीत बसणे पसंत केले.
शिरसाट विमानात, भुमरे गाडीत!मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले आ. संजय शिरसाट हे मुख्यमंत्र्यांसमवेत नाशिकहून औरंगाबादपर्यंत विमानात होते, तर मंत्री भुमरे बिडकीनपर्यंत. दोन्ही नेत्यांना सोबत ठेवून मुख्यमंत्र्यांनी ‘समतोल’ साधल्याची चर्चा होती.