औरंगाबाद : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मोबाईल व संगणकावर मराठीचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याबाबत शासन जरी आग्रही असले तरी अनेक शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालये याविषयी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्याख्यान, निबंध लेखन स्पर्धा यासारख्या पारंपरिक व ‘सोयीचे’ कार्यक्रम आयोजित करून संस्थांनी कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळविले.
२०१३ पासून कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त सर्व मंत्रालयीन विभाग व त्या अंतर्गत येणार्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम घेणे बंधनकारक असते. बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी भूमिका घेऊन शासनाने यंदा मराठीच्या तांत्रिक विकासात्मक उपक्रमांवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने बोलू तसे टंकलेखन (स्पीच-टू-टेक्स्ट) करणार्या लिपिकावर व स्वरचक्र अशा अॅप्सद्वारे मोबाईलवर मराठी टंकलेखन करणे व संगणकावर युनिकोड मराठी कार्यान्वित क रणे, अशा उपक्रमांची सूची ३ फे ब्रुवारीच्या शासन निर्णयात दिलेली आहे; परंतु अनेक संस्थांनी ग्रंथपरिचय, व्याख्यान, निबंध लेखन स्पर्धा, काव्यवाचन, काव्यसंगीत सभा, असे पारंपरिक कार्यक्रम घेण्यातच धन्यता मानली. विद्यापीठात सात दिवस कार्यक्रम घेण्यात आले. पण, त्यामध्ये तांत्रिक कार्यक्रमांचा समावेश नव्हता. शाळा-महाविद्यालयांचीही तशीच स्थिती आहे. मराठी भाषेचा खरोखरच विकास करायचा असेल तर केवळ शासन नियमांची येनकेनप्रकारेण पूर्तता करणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी अधिक सक्रिय सहभागाची गरज असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
काय आहे शासकीय उपक्रम सूची?विविध मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून मोबाईलवर मराठीतून टंकलेखन करणे, त्यासाठी लिपिकावर, स्वरचक्र अॅप, मराठी व्हाइस टायपिंग की बोर्ड, स्पीच नोटस्, हिअर टू रीड मराठी, व्हाईस टू टेक्स्ट, अशा मराठी की बोर्डचा वापर करणे, मराठी विश्वकोश मोबाईल अॅपचा प्रसार व प्रचार करणे, संगणकावर युनिकोड मराठी कार्यान्वित क रणे, नवीन पर्यायी शब्दनिर्मिती आदी उपक्रम शासनाने सुचविलेले आहेत.
मराठी पंधरवडाही दुर्लक्षितजानेवारी महिन्याचे पहिले १५ दिवस मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनातर्फे साजरा करण्याचा आदेश आहे. परंतु अनेक सरकारी कार्यालये आणि अधिकार्यांना याचा चक्क विसर पडल्याचे यावर्षी आढळून आले. अनेक कार्यालयांत हा पंधरवडा साजरा न झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यामुळे राज्य शासन मराठीविषयी कितीही प्रेम दाखवीत असले तरी त्यांचे विभाग त्यादृष्टीने एकसंघ होऊन काम करीत नसल्याचे दिसून येते.