औरंगाबाद : संशयितांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवणे, हे कोरोना नियंत्रणासाठी फार उपयोगी नाही. त्यांना घरी ठेवणे म्हणजे कोरोनाच्या वाढीस हातभार लावण्यासारखे आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनच गरजेचे आहे. प्रशासनाने ही व्यवस्था वाढविली पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असू शकते, अशा नागरिकांना क्वारंटाईन केले जाते. यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन असे २ प्रकार आहेत. शहरात मात्र, होम क्वारंटाईनचे प्रमाण अधिक आहे. सध्याची परिस्थिती पाहता होम क्वारंटाईनचा फारसा फायदा होताना दिसत नाही. त्यात शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क संशयितांचा जागेवरच स्वॅब घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. स्वॅब घेऊन संशयिताला क्वारंटाईन सेंटरऐवजी घरीच ठेवले जात आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जात आहे. एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर अहवाल येईपर्यंत इतरांना बाधा होण्याचा धोका वाढत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कोरोनाची लक्षणे दिसायला १ ते १४ दिवसांचा कार्यकाळ लागू शकतो. त्यामुळे ‘होम क्वारंटाईन’ केलेल्या नागरिकांनी १४ दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये, अशी सूचना दिली जाते, पण अनेक जण हा नियम पाळत नाहीत. अनेक जण घराच्या परिसरात फिरतात. ‘होम क्वारंटाईन’ केलेले १४ जण औरंगाबाद शहर सोडून अन्य जिल्ह्यांत गेल्याचे दोन दिवसांपूर्वीच समोर आले. त्यामुळे ‘होम क्वारंटाईन’ची अवस्थाच समोर आली आहे. यातून कोरोनाची साखळी वाढण्यास हातभार लागतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अधिक फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर हवे नियोजनशहरात मनपाकडून ७ ठिकाणी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची व्यवस्था केलेली आहे. याठिकाणी शनिवारी केवळ १९० नागरिक होते. दुसरीकडे या दिवशी ४८६ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले होते. शहरात अनेक मोठी महाविद्यालये, संस्था आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची व्यवस्था करण्यासाठी ते पुढे येऊ शकतात. शासनाकडून कोट्यवधींचा निधीही औरंगाबाद जिल्ह्याला प्राप्त होत आहे. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन फायदेशीरहोम क्वारंटाईन ही संकल्पना निरुपयोगी असल्याचे समोर आलेले आहे. कारण आपल्याकडे नागरिक सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाहीत. तरीही त्यावर विसंबून राहून धोका वाढविला जात आहे. दुसरीकडे स्वॅब घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला घरी ठेवल्यानेही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची गरज आहे. गेस्ट हाऊस, सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालयांत ही सुविधा करणे शक्य आहे.- डॉ. अमोल अन्नदाते, आरोग्य विश्लेषक