बीड : दुष्काळी स्थितीमुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर भार वाढलेला असताना डागडुजीच्या निधीला यंदा जि.प. ने कात्री लावली आहे. निधी वाढवून देण्याची मागणी जि.प. उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांनी बुधवारी केली.अंबाजोगाई तालुक्यात तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. पूस वीसखेडी, पट्टीवडगाव व नऊ खेडी व केज, धारुर पाणीपुरवठा योजनांचा त्यात समावेश आहे. दुष्काळ तीव्र बनल्याने पूस वीस खेडी योजनेवरुन ११ गावांना दररोज ६५ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पट्टीवडगाव व नऊ खेडी योजनेवरुन ३५ ठिकाणी पाणी पुरविले जाते. केज, धारुर योजनेवरुनही मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा सुरु आहे. दरवर्षी या तीन योजनांसाठी जि.प. च्या स्वत:च्या उत्पन्नातून दुरुस्ती कामांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली जायची. यंदा भयावह दुष्काळ असून योजनांवरचा ताण वाढलेला आहे. असे असतानाही जि.प. अर्थसंकल्पात केवळ २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी अपुरा पडण्याची शक्यता आहे. निधी वाढवून देण्याची मागणी जि.प. उपाध्यक्षा दौंड यांनी सीईओ नामदेव ननावरे यांच्याकडे केली. (प्रतिनिधी)
प्रादेशिक योजनांच्या दुरुस्तीसाठी अपुरा निधी
By admin | Published: April 20, 2016 11:03 PM