औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी भारतीय जनात पक्षाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र बोराळकर यांना तिकीट भेटल्याने भाजपात बंडखोरीची सुरुवात झाली आहे. भाजपाचे बीड जिल्हा माजी अध्यक्ष रमेश पोकळे आणि तिकिटासाठी स्पर्धेत असलेले प्रवीण घुगे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बोराळकर यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे दोघेही भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात.
शिरीष बोराळकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असल्याने पदवीधरसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. उमेदवारीवरून पक्षात मतांतरे आहेत याची कबुलीच प्रदेक्षाध्यक्ष पाटील यांनी यानंतर एका पत्रकार परिषदेत दिली होती. बोराळकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपत अंतगर्त नाराजी वाढून या निवडणुकीत बंडखोरीचा सामना करावा लागणार हे स्पष्ट झाले होते. बुधवारी भाजप बीड जिल्हा माजी अध्यक्ष रमेश पोकळे आणि प्रवीण घुगे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोघेही पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जात असून त्यांनी उमेदवारीसाठी दावा सुद्धा केला होता.
पक्षाने सांगितले म्हणून...सुरुवातीपासूनच भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे प्रवीण घुगे यांनी बंडखोरी करून उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी घुगे यांनी पक्षाने सांगितले म्हणून उमेदवारी दाखल केली असे स्पष्ट केल्याने उमेदवारीचा तिढा आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा हातात घेऊन रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत पसंतीनुसार मतदान असते. दुसऱ्या पसंतीची उमदेवार म्हणून मला संधी आहे असा दावा पोकळे यांनी यावेळी केला. पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधातली बंडखोरी निवडणुकीत रंगत आणणारी ठरणार आहे.