औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बॅनर, झेंडे विविध ठिकाणी डकविण्यात आले असल्याने विद्रूप दिसत आहेत.
महिनाभरापूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठात बाहेरील संघटना, पक्ष, संस्थांचे बॅनर लावण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तसेच विद्यापीठातील कार्यक्रमासाठी लावण्यात आलेले बॅनर, झेंडे कार्यक्रमानंतर तात्काळ काढून घेण्यात येतील, असाही ठराव केला होता; मात्र कुलसचिव कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे सगळीकडे बॅनर, झेंडे लावण्यात आल्याचे चित्र आहे. यात विद्यापीठ प्रवेशद्वार, रस्त्यावरील दिव्यांचे खांब, कुलगुरू निवासस्थान, रस्त्यावरील झाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर, मुख्य इमारत, ग्रंथालय, पाण्याची टाकी आदी ठिकाणी बॅनर, झेंडे, पोस्टर लावून परिसर विद्रूप केला आहे. विद्यापीठात ‘नॅक’साठी सगळीकडे स्वच्छता, दुुरुस्ती सुरू असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.