वाळूज महानगर : कामगारांना कोणतीही कल्पना न देता फायझर कंपनी व्यवस्थापनाने अचानकपणे कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने (इंटक) सोमवारपासून कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील फायझर कंपनीच्या प्लांट ८ व ९ मध्ये इंटकचे सदस्य असलेले ४८ कामगार आहेत. अचानक कंपनी बंद करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतल्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. शिवाय इंटकच्या कामगारांचा डिसेंबर २०१८ पासून पगार दिलेला नाही.
कंपनी व्यवस्थापनाचा हा निर्णय कामगारांवर अन्याय करणारा आहे. कंपनीच्या या निर्णयाविरोधात व कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर घ्यावे आणि मागील थकबाकी देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी संघटनेतर्फे सोमवारपासून कामगार आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली. संघटनेचे जिल्हासचिव अशोक निकम, अप्पासाहेब खेडकर, प्रवीण थोरात, बाबासाहेब वाघमारे, मच्छिंद्रनाथ खाजेकर आदी कामगार उपोषणाला बसले आहेत.