औरंगाबाद: शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्यी बैल, म्हशी चोरीचे गुन्हे करून शेतकऱ्यांची झोप उडविणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनीअटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत विविध ठिकाणाहून चोरलेली जनावरे विक्री केल्याची कबुली दिली. आरोपींचे चार साथीदार पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाळू उर्फ सोमनाथ उमाजी माळी (वय ३१,रा. गोपाळवस्ती, ता. गेवराई, जि. बीड),ज्ञानेश्वर उर्फ माऊली श्रावण माळी, (वय २४), अविनाश उर्फ अवि फु लसिताराम जाधव(२४(रा. बेलगाव,ता.गेवराई ) ,सोपान उर्फ गोट्या अशोक धनगर(वय२०,रा. रामनगर तांडा, ता. गेवराई,जि.बीड)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या आरोपींची अन्य चार साथीदार पसार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे म्हणाले की, लाडगाव येथील अशोक साळुबा बागल यांच्या शेतातील गोठ्यातून तीन बैल चोरट्यांनी २४ मे रोजी रात्री चोरून नेले होते.याविषयी बागल यांनी करमाड ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथील रंगनाथ नारायण कोंडके यांच्या शेतातील बैल २४ मे रोजी रात्री चोरीला गेले होते. याविषयी कोंडके यांनी वडोदबाजार ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. तर तिसऱ्या घटनेत पैठण तालुक्यातील बोकुडजळगाव येथील योगेश लहू लोखंडे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलेल्या दोन म्हशी चोरीला गेल्या होत्या.
महागडा चारा विकत घेऊन जगविलेली जनावरे चोरटे पळवित असल्याने बळीराजाची झोप उडाली होती. ही बाब पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी याविषयी कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, कर्मचारी विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, संजय काळे, सागर पाटील, गणेश गांगवे, राहुल पगारे, रामेश्वर धापसे, योगेश तारमळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांच्या पथकाने तपास केला तेव्हा ही जनावरे आरोपी बाळू माळीच्या टोळीने चोरल्याचे त्यांना समजले. यानंतर पोलिसांनी बाळू माळी आणि त्याच्या तीन साथीदारांना विविध ठिकाणाहून अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत लाडगाव येथील शेतातून जनावरे चोरल्याचे सांगितले. तसेच अन्य साथीदार रमेश होणाजी सावंत, रमेश माळी, रामा गव्हाणे आणि भाऊसाहेब धनगर यांच्या मदतीने अन्य विविध ठिकाणची जनावरे चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून एक बैल, रोख रक्कम, वाहने नेण्यासाठी वापरलेले मालवाहू वाहन,मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.