औरंगाबाद: लालवाडी शिवारातील वॉचमनचे हातपाय बांधून १ लाख रुपये किंमतीचे अॅल्युमिनिअम तारांचे बंडले पळविणाऱ्या आंतरराज्यीय तीन चोरट्यांना ग्रामीण गुन्हेशाखेने शिताफीने अटक केली. आरोपींनी अॅल्युमिनीअम तार विक्री करून मिळविलेली २० लाखाची रोकड, मोबाईल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार असा सुमारे २३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
राहुल कैलासचंद शर्मा (२७,रा. गायत्रीनगर, ता.जि. जयपूर, राजस्थान), दिनेशकुमार बाबुलाल मालवी (२८, रा. कालीयाखेडी, ता. मल्हारगड, जि. मनसोर, राजस्थान) आणि नितेश मनोजकुमार शर्मा (२१,रा. मुरलीपुरा, जयपुर,राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले की, लालवाडी (ता.औरंगाबाद) शिवारात महापारेषण कंपनीचे कंत्राटदार लाल महमंद यांनी उच्च वीज वाहिनींच्या कामासाठी अॅल्युमिनिअम तारांची बंडले आणि अन्य माल आणून ठेवला आहे. तेथेच कामगार आणि वॉचमनही राहतात. २५ जानेवारी रोजी रात्री चार ते पाच दरोडेखोरांनी वॉचमनला जिवे मारण्याची धमकी देत त्याचे हातपाय बांधले आणि शेजारील शेतात नेऊन टाकले. तेथेच गुपचूप पडून रहा नाही तर तुला जीवे मारून टाकू अशी, धमकी आरोपींनी दिली.
दोन दरोडखोर त्यांच्याजवळ ठेवून अन्य दरोडखोरांनी अॅल्यूमिनीअम तारांची ९ बंडले क्रेनने उचलून ट्रकमध्ये भरून नेली. वॉचमन मोकलेसुर रहेमान अब्दुल यांनी २६ जानेवारीला करमाड ठाण्यात तक्रार नोंदविली. तेव्हापासून गुन्हेशाखेचे अधिकारी ,कर्मचारी दरोडेखारांचा शोध घेत होते. पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांतून ट्रक आणि कारचे क्रमांक मिळविले. एका पथकाने मध्यप्रदेश, राजस्थाननंतर दिल्ली गाठली. दिल्लीतील रोहीणीनगरात सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या. सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी अन्य ६ आरोपींसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरलेल्या तारांच्या विक्रीतून आलेली २० लाखाची रोकड पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केली. गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार, मोबाईल जप्त केले.
यांनी केली कामगिरीपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, गणेश मुळे, बाळू पाथ्रीकर, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, दिपेश नागझरे, प्रमोद साळवी, ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर धापसे, योगेश तरमळे, जीवन घोलप, संजय तांदळे, करमाडचे निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक जागडे यांनी केली.