औरंगाबाद : डिझेल चोरी करणाऱ्या टोळीने जळगाव येथे तब्बल २३ लाख रुपयांचे टायर चोरी केल्याची कबुली दिली आहे. सध्या ही टोळी ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत असून कोठडीची मुदत संपताच त्यांंना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
प्रदीप राठोड यांच्या सोलापूर - धुळे महामार्गावरील चितेगाव शिवारात ‘श्री पेट्रोलियम’ नावचा भारत पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे. पेट्रोल पंपातून चोरट्यांनी बुधवारी पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान ‘डीप रॉड’मधून पाइपच्या साह्याने तब्बल ३ हजार ४८० लिटर डिझेलची चोरी केली. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड येथील नवीन टोल नाक्यावर सापळा रचून उस्मानाबाद जिल्ह्यातील या टोळीचा प्रमुख अट्टल गुन्हेगार राम्या पाम्या पवारसह १४ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार ट्रक, दीड हजार लिटर डिझेल, ०३ हँडपंप, ४३ हजारांची रोकड, ८ मोबाइल असा एकूण ९८ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला होता. सध्या १४ आरोपींना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
गुजरात येथून वाळूची तस्करी करणाऱ्या राम्या पाम्या पवार याची टोळी ट्रकमधील डिझेल संपले की जवळच्या पंपावरून डिझेल चोरायचे. त्यापाठोपाठ ते ट्रकसाठी टायर देखील चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी पोलीस कोठडीत या चोरट्यांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता राम्या पवारच्या टोळीने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ११ ऑक्टोबर २०२० रोजी टायरचे दुकान फोडून तब्बल २३ लाखांचे टायर लंपास केलयाची कबुली दिली. टायरची चोरी करून त्यांनी त्यांच्या ट्रकला टायर लावले तसेच काही टायर हे काही ट्रकचालकांना स्वस्तात विक्री केल्याची कबुली दिली. तसेच या टोळीने पाटोदा शिवारात देखील पंपावरून डिझेल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे.