जालना : मंठा तालुक्यातील शिवणगिरी येथे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी शुक्रवारी भेट देऊन येथील ग्रामस्थांची सुसंवाद साधला. शुक्रवारी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी नायक हे अधिकाऱ्यांसह शिवणगिरीत दाखल झाले. रात्री १ वाजेपर्यंत ते गावात थांबले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली, समस्या जाणून घेतल्या. गावात इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे, ही शाळा इयत्ता आठवीपर्यंत करावी, स्मशानभूमीला शेड, संरक्षक भिंत, दलित वस्तीत पथदिवे आदी समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याठिकाणी नेहमीच पाणीटंचाईची समस्या असते. त्यामुळे गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागते, अशी कैफियत ग्रामस्थांनी मांडली. त्यावर जिल्हाधिकारी नायक यांनी आमदार निधीसह इतर योजनांमधून तसेच लोकसहभागातून पाणलोट विकासाची कामे करण्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. येथील स्वस्त धान्य दुकानदार जादा दराने धान्य देत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यावर तहसीलदार छाया पवार यांना निर्देश दिले. या अनुषंगाने सोमवारी पवार या संबंधित दुकानदाराची तपासणी करणार आहेत. दरम्यान, शिधापत्रिका, विविध प्रमाणपत्र ग्रामस्थांना देण्यासाठी शिबीर घेण्यात येईल, असे आश्वासन नायक यांनी दिले. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांपैकी एका नायक यांच्या सूचनेप्रमाणे तातडीने जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मेंदूच्या आजाराने ग्रासलेल्या तरुणास मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे, परतूरचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार छाया पवार यांच्यासह गटविकास अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मध्यरात्री दीड वाजेपर्यंत गावात मुक्कामजिल्हाधिकारी गावात दाखल होणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह पहावयास मिळाला. ग्रामस्थांनीही दिलखुलासपणे आपल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनीही रात्री दीड वाजेपर्यंत गावात थांबून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. जिल्हा निर्मितीपासून पहिल्यांदाच शिवणगिरीत जिल्हाधिकारी आले. नायक यांच्यापूर्वी कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी या गावास भेट दिली नव्हती.
नायक यांनी साधला शिवणगिरीकरांशी सुसंवाद
By admin | Published: June 16, 2014 12:10 AM