औरंगाबाद : मालमत्ता कराच्या थकबाकीवर मनपातर्फे चक्रवाढ व्याज, दंड लावण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकीदार मनपाकडे रक्कम भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा व्याज, दंडावर ७५ टक्के सूट देऊन विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी सूचना मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला केली. प्रशासनाने यावर विचार सुरू केला आहे.
महापालिकेने १५ दिवसांपूर्वी थकबाकीदारांच्या मालमत्तांना सील ठोकण्याची कारवाई सुरू केली. त्यामुळे थकबाकीदारांनी त्वरित थकबाकी भरण्यास सुरुवात केली. वसुलीसाठी कोणताही त्रास सहन करून घेण्याची मानसिकता अधिकारी, कर्मचाºयांमध्ये राहिलेली नाही. थकबाकीदारांनी वॉर्ड कार्यालयात स्वत: येऊन थकबाकी भरावी, असे प्रशासनाला वाटत आहे. प्रशासनाच्या या मानसिकतेमुळे मागील दीड वर्षापासून तिजोरीत खडखडाट आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचा टक्का वाढेना, दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याकडेही दुर्लक्ष आहे. परिणामी, उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती असून, आजघडीला कंत्राटदारांची सुमारे २५० कोटींपेक्षा अधिक देणी थकलेली आहेत. विकासकामेही रखडली आहेत. आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मागील वर्षी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेत तीन वेळा विशेष मोहीम राबविण्यास प्रशासनाला भाग पाडले. पहिल्यांदा मोहीम राबविताना थकीत मालमत्ता करावरील व्याजात ७५ टक्के, नंतर ५० टक्के आणि शेवटच्या टप्प्यात २५ टक्के सूट नागरिकांना देण्यात आली होती. परिणामी, मागील वर्षी शंभर कोटींपेक्षा अधिक कोटींची वसुली करण्यात पालिकेला यश आले. यंदाही आतापर्यंत दोन वेळा महापौरांनी पुढाकार घेत विशेष मोहीम राबविली. मात्र, यात व्याज व दंडात कोणतीही सूट पालिकेने जाहीर केली नाही. परिणामी, या मोहिमांना अल्प प्रतिसाद मिळाला.प्रशासनाने सहमती दिलीय- महापौरआता पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवून ७५ टक्केसूट द्यावी, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना मंगळवारी केली. त्यावर आयुक्तांनी सहमती दर्शविल्याचे महापौरांनी सांगितले.