औरंगाबाद : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष तसेच धम्मदीक्षा सोहळ्यास ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून येत्या १४ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बीड बायपास रोडलगतच्या जबिंदा लॉनवर उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन रविवारी सकाळी झाले असून महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना या महोत्सवाचे संयोजक भंते धम्मज्योती थेरो यांनी सांगितले की, जगभरातील बौद्ध राष्ट्रांसोबत भारतीय बौद्धांचे शैक्षणिक, धार्मिक, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्याचा हेतू आहे. महोत्सवाचे उद्घाटन दिल्ली येथील लामा लोबजोन यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे याशिवाय तेथील खा. उदय गमनपिल, खा. रोहित रतवन, राजदूत सरोज श्रीसेना, कोरियाचे राजदूत सांम चून हे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री रामदास कदम, दिलीप कांबळे, अर्जुन खोतकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले असतील.आ. संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवात सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात भदन्त बोधिपालो महाथेरो, भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर, डॉ. खेमधम्मो महास्थवीर, भदन्त एस. काश्यपायन, भदन्त प्रज्ञाशील महास्थवीर आदींसह बौद्ध भिक्खू हे धम्मदेशना देतील. या आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवामध्ये ‘सिद्धार्थ गौतम’ या चित्रपटातील प्रमुख अभिनेते गमन मलिक व अभिनेत्री आचल सिंह यांच्यासह एअरक्राफ्ट हे विमान तयार करणारे तरुण संशोधक अमोल यादव, माजी मंत्री गंगाधर गाडे, कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष शंकर आणि अशोक आठवले यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवाची जय्यत तयारी
By admin | Published: October 03, 2016 12:26 AM