औरंगाबाद : बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कार्गो हब सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, सुरक्षा समितीची नुकतीच परवानगी मिळाली आहे. आगामी दीड ते दोन महिन्यांत ‘कस्टम’ अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन नोव्हेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील डाळिंब, मोसंबी, द्राक्षे आदी कृषी उत्पादनांसह बियाणे, स्टील, औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याचा विचार पुढे आला. यासाठी परिसरातील भूसंपादन करण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव भारतीय विमान प्राधिकरणासह केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. सुरक्षा विभागाचा हिरवा कंदिल न मिळाल्याने दोन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता.
विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांच्यासह काही उद्योजकांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कार्गो सेवा प्रस्तावाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय नागरी सुरक्षा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन विमानतळ परिसराची पाहणी केली. विमानतळाच्या जुन्या इमारतीत तूर्तास कार्गो हब सेवा सुरूकरण्यास सुरक्षा विभागाची मंजुरी मिळाली आहे. कस्टम अधिकाऱ्यांची या प्रकल्पाची सेवा सुरूकरण्यास आवश्यकता असल्याने या जागा भरणे आवश्यक आहे. याबाबत कस्टम विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विभागाकडून आगामी दीड ते दोन महिन्यांत कस्टम अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती होण्याची शक्यता असून, नोव्हेंबरअखेर कार्गो हबमधून सेवा प्रत्यक्षात सुरू होऊ शकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन महिन्यात प्रक्रिया सुरु होणार केंद्रीय नागरी सुरक्षा महामंडळाकडून कार्गो हब सुरूकरण्याबाबत मंजुरी मिळाली आहे. नागपूर विभागाकडून कस्टम अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती होताच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. आगामी दोन महिन्यांत ही प्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे. - डी. जी. साळवे, संचालक, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरण