औरंगाबाद : नव्या पिढीला संस्कारक्षम बनविण्यासाठी, विद्यार्थीजीवनात यश मिळविण्यासाठी, व्यापारातील प्रगती व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ३१ ऑक्टोबरला (शनिवार) ३६ आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय ऑनलाईन गुरुमंत्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. ऑनलाईन पत्रपरिषदेत सारस्वताचार्य देवानंदीजी गुरुदेव, दिगंबर जैनाचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव व राष्ट्रसंत युवाचार्य गुणधरनदिजी गुरुदेव यांनी महोत्सवाची माहिती दिली. या महोत्सवात ३६ आचार्य, ३६ मुनिराज, ३६ गणिनी आयिका, ३६ आयिका माताजी यांच्या विशेष मार्गदर्शनात व १११ प्रतिष्ठाचार्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन गुरुमंत्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. सकाळी ७ ते ८.३० वाजेदरम्यान भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व अतिशय क्षेत्र येथे सामूहिक महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता विद्याप्राप्ती सरस्वतीविधान आणि गुरुमंत्र संस्कार व सायंकाळी सरस्वती आराधना होणार आहे. गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी सांगितले की, या महोत्सवासाठी देशभरातील ५ हजार युवक-युवतीची नावनोंदणी झाली आहे. आजची चांगली मुले उद्याचे पालक आहेत. मुलांना संस्कारित करण्यासोबत प्रज्ञावंत बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय संस्कृती वृद्धिंगत व्हावी, हा यामागील हेतू आहे. या महोत्सवाचे आयोजन नवग्रहतीर्थ वरूर, नमोकार तीर्थ नाशिक व धर्मतीर्थ क्षेत्र कचनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय ऑनलाइन गुरुमंत्र महोत्सव आज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 5:11 AM