औरंगाबाद : दुबईत पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्या ओळखीचे तिथे कुणीच नव्हते. हातात नोकरीही नव्हती. नाही म्हणायला फक्त एका दूरच्या मैत्रिणीचा आधार, पण त्यांची हिंमत मात्र जबरदस्त होती. याच हिमतीच्या जोरावर त्या तिथे टिकल्या आणि स्थिरावल्या. म्हणूनच, तर जेहरा जाफरी आज इतरांसाठी आदर्श ठरल्या आहेत.
जेहरा जाफरी यांचे शालेय शिक्षण औरंगाबादच्या मॉडेल स्कूलमध्ये झाले. राजर्षी शाहू महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीच्या शोधात दुबईला जाण्याचे ठरवले. २००२ साली म्हणजे, तब्बल १९ वर्षांपूर्वीचा काळ दुबई येथे जाण्यासाठी आजच्या तुलनेत कठीणच होता, पण नोकरीच्या शोधात मुले परदेशात जाऊ शकतात, तर मुली का नाही असे जेहरा यांचे ठाम मत होते. लेकीची हिंमत आणि आत्मविश्वास पालकांनीही ओळखला आणि त्याला दुजोरा देत जेहरा यांना दुबईला जाण्याची परवानगी दिली.
दुबईत गेल्यानंतर जेहरा यांना अनेक स्तरांवर संघर्ष करावा लागला. येणारे प्रत्येक आव्हान त्यांनी स्वीकारले आणि त्याचे संधीत रूपांतर केले. आज जेहरा दुबई येथील एका मोठ्या कंपनीत यशस्वी बिझनेस ॲनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. पालकांच्या चेहऱ्यावर खुललेले हसू ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी कमाई आहे, असे जेहरा यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, महिलांमध्ये खरोखरच खूप ताकद असते. त्यामुळे महिलांनी जर काही करायचे मनापासून ठरविले, तर त्या ती गोष्ट नक्कीच मिळवू शकतात. म्हणूनच, आधी तुम्ही हिंमत करा, परिस्थिती आपोआप बदलेल, असे जेहरा यांनी स्वानुभवातून सांगितले.
मुलींना आधार आणि पाठिंबा द्याखूप मुलींना आजही बाहेर पडून स्वतःच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळत नाही. अशा मुलींच्या पालकांनी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे. मुलींना आधार आणि पाठिंबा द्या, असे आवाहन महिला दिनानिमित्त जेहरा यांनी प्रत्येक मुलीच्या पालकांना केले आहे.
नान खलिया खूप जास्त मिस करते परदेशात गेल्यावर औरंगाबादची प्रसिद्ध डिश नान खलिया मी खूप जास्त मिस करते. माझ्या घरापासून ते शाहगंज, गुलमंडी या बाजारपर्यंत औरंगाबादची प्रत्येक गोष्ट मला आवडते आणि परदेशी गेल्यावर या प्रत्येक गोष्टीचीच खूप आठवण येते.