औरंगाबाद : वडिलांना नेहमी वाटायचे की, मला मुलगा असता, तर मी त्याला इंजिनीअर केले असते. अशा वेळी मी त्यांना समजवायचे. इंजिनीअर व्हायला मुलगाच का पाहिजे, मी आहे ना, मी तुमचे स्वप्न पूर्ण करेल. असे सांगणारी त्या वडिलांची ती चिमुकली एक दिवस खरेच इंजिनीअर झाली आणि तिने थेट मंगळापर्यंत झेप घेतली.
मंगळ ग्रहाला गवसणी घालणारी ही औरंगाबादची कन्या म्हणजे नासा इंजिनीअर असणाऱ्या योगिता शाह. ‘मुश्किलोंके आगे झुकना तो सिखा ही नही... ’ हे योगिता यांचे जीवन जगण्याचे सूत्र. योगिता यांनी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल शाखेत १९९८ साली शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, कॅलिफॉर्निया येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर, युनायटेड स्टेट एअरफोर्स येथे त्यांनी कामाला सुरुवात केली. नासातर्फे मंगळ ग्रहापर्यंत जे रोव्हर यशस्वीपणे पाठविण्यात आले होते, त्या मोहिमेत योगिता यांनी एरिऑनिक्स डोमेन लीड म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. मिशन मार्स- २०२०, जीपीएस सॅटेलाइट ग्रॅण्ड सीस्टिम, आर्मीसाठी वापरण्यात येणारी सायबर सेक्युरिटी मोहीम हे करिअरमधील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पे आहेत, असे योगिता यांनी सांगितले.
क्रांती चौकातली पावभाजी आणि बदामशेकदर रविवारी हॉस्टेलची मेस बंद असायची. त्यामुळे मग आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी मिळून रविवारी संध्याकाळी आमच्या महाविद्यालयापासून ते क्रांती चौकापर्यंत पायी जायचो. तिथे गेल्यावर पावभाजीवर यथेच्छ ताव मारायचो आणि नंतर बदामशेकचा आस्वाद घ्यायचो. क्रांती चौकातली ती पावभाजी आणि बदामशेकची चव अजूनही जिभेवर रेेंगाळते आहे, असे योगिता म्हणाल्या.
पहिले पाऊल उचलायला हिंमत लागतेआपल्याकडे अगदी चिमुकल्या वयापासून वेगवेगळी खेळणी देऊन मुले आणि मुली यांच्यात भेदभाव केला जातो. दोघांनाही सारखी खेळणी द्या आणि त्यातले काय निवडायचे हे त्यांना ठरवू द्या. मुलींनो, फक्त पहिले पाऊल उचलायला हिंमत लागते. एकदा ती हिंमत आली की, पुढचा प्रवास आपल्याही नकळत होऊन जातो, असा संदेश योगिता यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिला.